तलावाला लागून उभारताहेत शाळा, येनापूरचे सरपंचच झाले कंत्राटदार

गावकऱ्यांचा आक्षेप, प्रशासन दखल घेणार?

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी सोमनपल्ली गटग्रामपंचायतने येनापूरच्या गाव तलावाला लागूनच असलेली वनविभागाची जागा निवडली. पावसाळ्यात या परिसरात पाणी भरलेले असते. त्यामुळे ही जागा शाळा बांधकामासाठी धोकादायक असल्याचे सांगत गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे या बांधकामाचे कंत्राट स्वत: सरपंचानेच मिळवले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

बहुमताच्या जोरावर सुरू असलेल्या या कामामुळे आमच्या मुलांचा जीव धोक्यात येईल, असे सांगत गावकऱ्यांनी हे काम त्वरित थांबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास भविष्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेसाठी या कामाला मान्यता देणारे अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला.

यासंदर्भात गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. सोमनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येनापूर येथे वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीतील तलावालगत हे शाळा बांधकाम सुरू आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक राकेश अलोने यांना विचारले असता ग्रामपंचायतकडे कोणीली यासंदर्भात आक्षेप घेतला नसल्याचे ते म्हणाले. शाळेच्या जुन्या जागेचा वाद सुरू आहे. ज्या नवीन जागेत शाळा बांधकाम सुरू केले ती जागा वनविभागाची आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार वनविभागाने ती शाळा बांधकामासाठी दिली आहे. शिवाय शाळेला कंपाऊंड वॅाल राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होणार नसल्याचे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला सुरेश गुल्लीवार, राजू एनगिलवार, मोहन बंडावार, आनंद बंडावार, लक्ष्मण जक्कुलवार, दिलीप गुंतीवार, विनायक राऊत, रामजी सीडाम यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.