कुणबी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची होर्डिंगबाजी

अनेक ठिकाणी वेधतात लक्ष, पहा झलक

गडचिरोली : राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविण्यासह इतर मागण्यांसाठी ५ ऑक्टोबरला गडचिरोलीत कुणबी समाजाच्या वतीने महामोर्चा काढल्या जाणार आहे. या महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते सरसावले आहेत. शहरातील मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात आणि शहरातील प्रमुख मार्गांवर मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. सर्व आमदार आणि खासदारांसह इतरही नेत्यांनी आपापले होर्डिंग लावल्याने जणूकाही कोणाचे होर्डिंग मोठे आहे, याची स्पर्धाच लागली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

कलार समाजही होणार मोर्चात सहभागी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात वाटा देण्याला विरोध दर्शविण्यासाठी, तसेच ओबीसी संवर्गाच्या इतर मागण्यांसाठी 5 ऑक्टोबरच्या मोर्चाला कलार समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. एवढेच नाही तर जिल्हाभरातील कलार समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असाही निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आले. त्यावर जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, विदर्भ उपाध्यक्ष निरंजन वासेकर, रविंद्र वासेकर, श्रीनिवास दुल्लमवार, दामोधर मांडवे, दिलीप मेश्राम, सदाशिव मंडावार, किशोर गडपल्लीवार, कुणाल पडलवार, प्रभाकर मंडावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे समर्थन
मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये या मुख्य मागणीसह ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, गडचिरोलीमध्ये ओबीसींना 19 टक्के आरक्षण पूर्वरत करावे, शासकीय शाळांना कॉर्पोरेट समूहाला विकण्याचा निर्णय आणि सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी 5 ला महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा कुणबी समाजाचा असला तरीही हा लढा न्यायाचा व जनसामन्यांच्या हिताचा, संवैधानिक लढा असल्याने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने सर्वानुमते या मोर्चाला पाठींबा दिला आहे. तसेच बहुजन समाजाने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.