मुरूमगावात ‘एक दिवस समाजासाठी’ उपक्रमात ४० गावातील नागरिक सहभागी

आरोग्य तपासणीसह केले समाजप्रबोधन

गडचिरोली : गोंडवाना गोंड समाज मुरुमगाव, मुरुमगाव जमीनदारी ईलाका व जयसेवा कर्मचारी संघटना यांनी संयुक्तरित्या मुरुमगाव जमीनदारी ईलाक्यातील 40 गावांमधील नागरीकांकरिता ‘एक दिवस समाजासाठी’ हा अभिनव उपक्रम राबविला. त्याअंतर्गत समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन आणि सर्वांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन गुरूवारी केले होते.

प्रस्तावित गोंड समाजभवन कटेझरी रोड, मुरुमगाव येथे आयोजित या कार्यक्रमात मुरुमगाव व टिपागड क्षेत्रातील सर्व गावातील नागरीक, तसेच रांगी, मोहली, येरकड, सुरसुंडी, मुरमाडी व मालेवाडा क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फ़ुर्तीने सहभाग घेऊन कार्यक्रमांमधील सेवेचा लाभ घेतला.

उद्घाटक म्हणून भुपेंद्रशहा मडावी महाराज (माजी जमीनदार, मुरुमगाव क्षेत्र), तर अध्यक्षस्थानी अमरशाह मडावी महाराज (अध्यक्ष, गोंडवाना समाज टिपागड क्षेत्र) होते. समाजप्रबोधनाकरीता प्रमुख वक्ते म्हणून प्रा.नरेश मडावी (ईतिहास विभाग प्रमुख), डॉ.प्रमोद खंडाते (जिल्हा शल्य चिकित्सक) डॉ. कन्ना मडावी, डॉ.सचिन मडावी (समाज कल्याण आयुक्त), डॉ.बागराज धुर्व, डॉ.आशिष कोरेटी, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नारायण वट्टी, तहसीलदार रविंद्र होळी, राजेश नैताम, अजमन रावटे, पंजाब बँकेचे व्यवस्थापक कुमार आदित्य, गितेश कुळमेथे चंद्रपूर आदी हजर होते. प्रास्ताविक सुरेश नैताम यांनी केले.

1748 जणांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

या कार्यक्रमात 1748 रुग्णांनी नोंदणी करुन आरोग्य सेवेचा लाभ घेतला. त्यापैकी 598 लोकांना मोफ़त चष्मे वाटप करण्यात आले. 68 लोकांची पुढील उपचाराकरीता नोंद करण्यात आली. सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून मेडीट्रीना हॉस्पीटल नागपूर येथे मोफ़त उपचार करण्यात येणार आहेत. आभार प्रदर्शन नागेश टेकाम यांनी केले.