मतदार जागृतीसाठी अभियंत्याची महाराष्ट्रभर बाईक रायडिंग, पोहोचले गडचिरोलीत

पोलिस व लॅायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

गडचिरोली : व्यवसायाने अभियंता असलेले परभणीचे शैलेश कुलकर्णी बाईक रायडिंग करत एकटेच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात फिरण्यासाठी निघाले आहेत. कुलकर्णी आपल्या मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी गडचिरोलीत पोहोचले. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.

गडचिरोलीत येताच त्यांचे पोलिस स्टेशनच्या आवारात पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, पोलिस दलाचे कमांडो किशोर खोब्रागडे व त्यांचे सहकारी, तसेच लॅायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. कुलकर्णी यांनी २०१५ पासून अनेक वेळा बाईक रायडिंग केली असून त्यांच्या नावे ३ वर्ल्ड रेकॅार्डही नोंदविल्या गेले आहेत.

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुणांनी मतदार नोंदणी करावी आणि सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.