एसडीआरएफच्या चमुने शोधला आणखी एक मृतदेह, अजूनही तिघी जणी बेपत्ता

आता प्रवाहात ३० किमीपर्यंत शोधणार

गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव (डोंगा) उलटून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या चारपैकी एका महिलेचा (रेवंता हरीदास झाडे) मृतदेह शोधून काढण्यात यश आले. त्यामुळे या घटनेतील मृत महिलांची संख्या तीनवर गेली आहे. मात्र दिवसभराच्या शोधमोहिमेनंतरही उर्वरित तीन महिलांचा शोध लागला नाही. त्या महिला पाण्याच्या प्रवाहात दूरपर्यंत वाहून गेल्या असण्याची शक्यता पाहता गुरूवारी (दि.२५) नदीप्रवाहात ३० किलोमीटरपर्यंत त्यांचा शोध घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ता व्यवस्थापन अधिकारी नील तेलटेंबडे यांनी सांगितले.

मंगळवारी सकाळी झालेल्या या अपघातात डोंगा उलटून गणपूर येथील सात महिला वैनगंगा नदीच्या पाण्यात पडल्या होत्या. त्यापैकी सारूबाई कस्तुरे ही महिला आणि नावाडी कसेबसे बचावले, तर जिजाबाई राऊत आणि पुष्पा मुक्तेश्वर झाडे या दोन महिलांचे मृतदेह मंगळवारी हाती लागले होते.

बेपत्ता असलेल्या चार महिलांचा बुधवारी सकाळपासून एसडीआरएफच्या चमुने नदीपात्रात मोटारबोटच्या सहाय्याने शोध घेतला. यावेळी सकाळी रेवंता झाडे यांचा मृतदेह हाती लागला. पण अजूनही तीन महिलांचा शोध घेण्यात यश आलेले नाही. गुरूवारी नदीप्रवाहाच्या दिशेने आणखी पुढे जाऊन शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान या दुर्घटनेमुळे गणपूर गावावर चांगलीच शोककळा पसरली आहे.