जिल्ह्यात ३० वर्षाखालील मतदार वाढले, एकूण मतदारांमध्ये २२ टक्के वाटा

अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांची माहिती

गडचिरोली : यावर्षी होणार असलेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले आहे. त्यात 30 वर्षाखालील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत 18 ते 29 वर्ष वयोगटातील तरुण मतदारांचा वाटा 22 टक्क्यांवर गेला आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते.

मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबण्यात आली होती. सदर कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबवला गेला. या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते.

28,402 मतदार यादीतून वगळले

या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारूप मतदार यादीत 30 हजार 560 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 28 हजार 402 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 2,158 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकुण मतदारांची संख्या 8,04,149 इतकी झाली आहे. त्यानुसार एकुण पुरुष मतदार 4,05,703 तर महिला मतदारांची संख्या 3,98,436 आणि 10 तृतीयपंथी मतदारांची संख्या झाली आहे.

महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरूष गुणोत्तर 975 वरून 982 इतके झाले आहे.

प्रारूप मतदार यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 2,711 (0.34 टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 11,512 (1.43 टक्के) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या 1,58,546 (19.75 टक्के) होती, ती अंतिम यादीत 1,68,239 (20.92 टक्के) इतकी झाली आहे.

19,552 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये 3,594 एकसारखे फोटो असलेल्या मतदारांची तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत 1,031 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेल्या मतदारांची सखोल तपासणी करून 283 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.