आजपासून आरमोरीत रात्रकालीन ‘प्रकाश चषक’ क्रिकेट स्पर्धा रंगणार

लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील क्रिकेटप्रेमींचे आकर्षण असणाऱ्या आरमोरी येथील प्रकाश चषक टेनिस बॅाल रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार, दि.3 च्या संध्याकाळी सुरूवात होणार आहे. हितकारिणी विद्यालयालगतच्या प्रांगणातील तालुका क्रीडा संकुलात हे सामने रंगणार आहेत. या सामन्यांचे उद्घाटन संध्याकाळी 6 वाजता सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते होणार आहे.

दीप प्रज्वलन गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि भाग्यवानजी खोब्रागडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आ.कृष्णा गजबे तर विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, तहसीलदार उषा चौधरी, आरमोरीचे ठाणेदार कैलास गवते, न.प.मुख्याधिकारी माधुरी सलामे हे उपस्थित राहतील.

युवामंच व प्रकाश चषक आयोजन समिती, तथा मॅार्निंग ग्रुप आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय 1 लाख 75 हजार रुपये, तृतीय 31 हजार रुपये आणि चतुर्थ 31 हजार रुपये याप्रमाणे बक्षिस राहणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण यू-ट्यूबवर राहात असल्याने अनेक क्रिकेटप्रेमी या सामन्यांचा आनंद घेत असतात. आरमोरी तालुका आणि जिल्हा गटासाठी अशी 2 बक्षीसे राहतील. प्रत्येक सामन्यात मॅन आॅफ द मॅच दिला जाणार आहे.