‘लोकशाही मराठी’ वृत्तवाहिनीवरील प्रसारणबंदीचा गडचिरोलीत निषेध

प्रेस क्लबकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली : अल्पावधीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आणि निर्भिड पत्रकारितेमुळे लोकप्रिय झालेल्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर ३० दिवसांची प्रसारण बंदी घालण्याच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाचा गडचिरोलीत निषेध करण्यात आला. गडचिरोली प्रेस क्लबने यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन ही कारवाई मागे घेण्याची मागणी केली.

ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी वेळ न देता अचानक बंदीची कारवाई करणे ही मुस्कटदाबी आहे. त्यामुळे तातडीने ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री सचिवालयाच्या जिल्हा कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे, रोहिदास राऊत, अविनाश भांडेकर, मिलिंद उमरे, सुरेश नगराळे आणि लोकशाही मराठीचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षानेही कारवाईचा निषेध नोंदवत लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरील ३० दिवसांची बंदी मागे घेण्याची मागणी केली.