अंकिसा येथील असहाय झालेल्या कुटुंबाला अम्ब्रिशराव आत्राम यांचा मदतीचा हात

घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूने ओढवले संकट

सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा येथील प्रकाश नल्ला हे अपंग असूनही रोजंदारी करून आपल्या परिवाराचा कसाबसा उदरनिर्वाह करीत होते, पण अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार तुटला. अंत्यविधी करण्यासाठीही या कुटुंबाकडे सोय नव्हती. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्या कुटुंबाला १० हजारांची मदत करून दिलासा दिला.

मृत नल्ला यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. कार्यकर्ते श्रीनाथ राऊत यांनी याबाबतची माहिती अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मदतीचा हात पुढे केला.

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा नल्ला कुटूंबाला लाभ मिळण्यासाठी मदत करणार असल्याचे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला सांगितले. यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते श्यामसुंदरराव मेचिनेनी, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, तालुका सचिव देवेंद्र रंगू आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते.