त्रिवेणी संगमावर नदीत रस्ता बनवून खुलेआम सुरू होती रेती तस्करी

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आणले उघडकीस

संगमाजवळ नदीपात्रात बनविलेल्या रस्त्याची पाहणी करताना अपर जिल्हाधिकारी भाकरे.

गडचिरोली : रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने सध्या रेती तस्करांकडून अनेक ठिकाणच्या रेतीघाटांवरून रेतीची लूट सुरू आहे. भामरागडजवळच्या त्रिवेणी संगमावर महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खुलेआम रेती काढण्याचा प्रकार अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी उघडकीस आणला. त्यांनी लगेच जेसीबी बोलवून नदीपात्रात वाहनांना जाण्या-येण्यासाठी तयार केलेला रस्ता खोदून काढून अडलेले पाणी प्रवाहित केले.

अपर जिल्हाधिकारी भाकरे हे भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी त्रिवेणी संगमाकडे आपली गाडी वळवायला सांगितले. पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची रेती आहे. त्यामुळे नद्यांची रेती किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी भाकरे यांनी रेतीघाटावर पाहणी केली असता त्या रेतीवर आधीच तस्करांची नजर पडल्याचे दिसून आले. रेती काढण्यासाठी नदीपात्रात वाहनांना जाता यावे म्हणून वनविभागाच्या जागेतून मुरूम काढून तो नदीपात्रात भरून रस्ताही बनविण्यात आला होता.

हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यामुळे लगेच जेसीबी बोलवून तो रस्ता खोदून काढण्यात आला. तस्करांनी किती रेती चोरून नेली याची चौकशी करून कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले. या प्रकारामुळे रेती तस्करांना जोरदार झटका लागला असला तरी महसूल विभागाचे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि वनविभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.