बेशुद्ध होईपर्यंत मुलीवर बलात्कार, आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावास

एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला

गडचिरोली : घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार करणाऱ्या आणि त्यानंतर गोठ्याजवळच्या शौचालयात डांबून ठेवणाऱ्या आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. एवढेच नाही तर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ही शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश उत्तम मुधोळकर यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्शनीमाल गावात ३० मे २०१८ रोजी पीडित मुलगी घरालगत असलेल्या बाथरूममध्ये जाऊन येत असताना दुपारी ३ च्या सुमारास आरोपी अनिल कवडू मशाखेत्री (४० वर्ष) याने तिचा एक हात तोंडावर दाबून, ओढत घराच्या धाब्यावर नेऊन तिच्यावर पाशवीपणे बलात्कार केला. यामुळे पीडित मुलगी बेशुध्द पडली. आरोपीने तिला गोठ्याजवळ असलेल्या शौचालयात डांबून ठेवले.

बराच वेळपासून मुलगी घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान पीडित मुलीच्या भावाला गोठ्याजवळ असलेल्या शौचालयाच्या दारातून तिची ओढनी बाहेर आलेली दिसली. घरच्या मंडळींना लगेच तिकडे धाव घेतली असता पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत दिसली.

याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३६३, ३७६ (२) (३) व ३४२ अन्वये तसेच कलम ४ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, आणि अनुसुचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. साक्षीदारांचे बयान, सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून न्यायालयाने गुरूवारी आरोपी अनिल मशाखेत्री याला दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र कलम ३ अनूसुचित जाती जमाती कायद्यान्वये पुराव्याअभावी दोषमुक्त केले. दंडाची रक्कम पीडीतेला दिली जाणार आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास एसडीपीओ डॉ.सागर कवडे व पोलीस उपनिरीक्षक तेजस्वीनी पाटील यांनी केला.