आलापल्लीत तीन वाहनातून सुरू होती 10 लाखांच्या देशी-विदेशी दारूची वाहतूक

अहेरी पोलिसांची तस्करांवर धडक कारवाई

अहेरी : जिल्ह्यात अवैधरित्या छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारु विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये बुधवारच्या रात्री दोन कारवायांमध्ये तीन वाहनांना पकडून १० लाखांच्या दारूसह तेवढ्याच किमतीची तीन वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई अहेरी पोलिसांनी आलापल्ली भागात केली. अहेरी पोलिसांच्या या धडक कारवाईने दारू तस्करांमध्ये दहशत पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीत योगेश अरुणसिंग चव्हाण हा देशी-विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती अहेरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोउपनि काळे आणि पथकाने आरोपी योगेश चव्हान याच्या घराच्या अंगणातील मारुती कारची (एम.एच.–34-ए.एम.–8549) झडती घेतली असता देशी-विदेशी दारूच्या पेट्या आढळल्या. वाहनासह एकूण 4 लाख 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत आलापल्ली येथील दोन इसम चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक करणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलिस पथक आलापल्ली परिसरात वाहनाची तपासणी करित असताना दोन इसम संशयास्पद हालचाल करताना दिसून आले. विचारपुस करण्यासाठी त्यांच्या जवळ जात असताना सदर दोन्ही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी पोलिसांनी वाहनाजवळच त्या दोन्ही इसमांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या टाटा इंडिका विस्टा (एम.एच-32-सी.-6050) आणि टर्बो कंपनीच्या (एम.एच-24-जे.-9564) वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या पेट्या आढळल्या. त्या दारूसह वाहनांची मिळून एकूण किंमत 15 लाख 98 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडलेल्या आरोपींनी त्यांचे नाव गुड्डू वर्मा, रा.चंद्रपूर आणि अरविंद हिरामण भांडेकर, रा.येवला ता.गडचिरोली असे असल्याचे सांगितले. त्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा.आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा.चंद्रपूर हा त्याचा पार्टनर असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींविरुध्द अहेरी ठाण्यात दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.