तुमच्या वाहनाला कोणता नंबर पाहिजे? आकर्षक नंबर लवकर राखीव करा

आजपासून सुरू होणार नवीन मालिका

गडचिरोली : आपल्या वाहनाला फॅन्सी, अर्थात आकर्षक नंबर असावा असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी रितसर परिवहन विभागाने ठरवून दिलेले अतिरिक्त शुल्क भरण्याचीही अनेकांची तयारी असते. परंतू चालू मालिकेत (सिरीजमध्ये) हवा असलेला नंबर आधीच बुक झालेला असल्याने अनेकांना निराश व्हावे लागते. मात्र गडचिरोली परिवहन कार्यालयाकडून आता एमएच 33 एडी ही नवीन मालिका सुरू होत आहे. त्यामुळे फॅन्सी नंबरची क्रेझ असणाऱ्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक / पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता आज, दि.27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजतापासून अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक / पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबरकरीता लिलाव करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.