दोन माजी आमदारांनाही वाचवता आली नाही आपली अनामत रक्कम

29 पैकी 22 उमेदवारांचे डिपॅाझिट जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघांमध्ये 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 22 उमेदवारांना कमी मतदान झाल्याने त्यांचे डिपॅाझिट जप्त झाले. विशेष म्हणजे त्यात दोन माजी आमदारांचाही समावेश आहे. 29 पैकी केवळ 7 उमेदवार आपले डिपॅाझिट वाचवू शकले आहेत.

विधानसभेसाठी उमेदवारी दाखल करताना संबंधित उमेदवाराला विशिष्ट रक्कम अनामत म्हणून भरावी लागते. त्या उमेदवाराने एकूण मतदानाच्या 1/6 एवढी मतं घेतली की ती अनामत रक्कम त्यांना परत केली जाते. मात्र 29 पैकी 22 उमेदवार तेवढी मतं घेऊ शकले नाहीत.

आरमोरी मतदार संघात 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी कृष्णा गजबे आणि रामदास मसराम वगळता कोणत्याही उमेदवाराला अनामत रक्कम वाचवला येईल एवढी मतं मिळाली नाहीत. त्यात दोन वेळा आमदार राहिलेले आनंदराव गेडाम यांचाही समावेश आहे.

अहेरी मतदार संघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी धर्मरावबाबा आत्राम, अम्ब्रिशराव आत्राम आणि भाग्यश्री आत्राम वगळता इतर सर्व 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात माजी आमदार दीपक आत्राम यांचाही समावेश आहे.

गडचिरोली मतदार संघात 9 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी डॅा.मिलिंद नरोटे आणि मनोहर पोरेटी वगळता कोणालाही अनामत रक्कम वाचवणे शक्य झाले नाही.