ब्रम्हपुरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साकारण्यात आला. यावेळी करण्यात आलेली भव्यदिव्य रोषणाई आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत जमलेले बालगोपाल विशेष आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती. यावेळी खा.नेते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, जनतेचे राजे होते. त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी सुशासन आणि प्रशासनाचा योग्य उपयोग कसा करता येतो याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचा गौरव करुन छत्रपतींचे विचार सर्वांनी अंगीकारावे, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश बगमारे , भाजप शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुद्धे, युवा नेता अमित रोकडे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, बालगोपाल व नागरिक उपस्थित होते.