आलापल्लीत ‘पीएम स्किल फॅार रन’, 230 युवक-युवतींनी घेतला सहभाग

अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पुढाकाराने आयोजन

आलापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आलापल्ली येथे पीएम स्किल फॅार रन या दौडचे आयोजन केले होते. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रायोजकत्वातून पुरूष आणि महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटातील प्रथम तीन स्पर्धकांना रोख बक्षिस देण्यात आले. एकूण २३० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.

आलापल्लीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून स्पर्धकांना २५० टी शर्ट, ग्लुकोज पाणी, अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती. प्र.प्राचार्य वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र.गटनिदेशक डी.एच. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अहेरी ठाण्याचे पो.निरीक्षक काळबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एपीआय व्ही.बी. चव्हाण, सरपंच सागर बिट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेमध्ये २३० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

असे आहेत विजेते स्पर्धक

पुरुष गट – राकेश चौधरी (प्रथम ३००० रुपये), रमेश तलांडे (द्वितीय २००० रुपये), अजय चलाख (तृतीय १००० रुपये)

महिला गट – प्रतिभा आलाम (प्रथम ३००० रुपये), अंकिता गावडे (द्वितीय २००० रुपये), भूमिका डांगे (तृतीय १००० रुपये)

प्रोत्साहन बक्षिस – अंकिता अनिल मडावी (१० वर्ष), निकिता अनिल मडावी (१२ वर्ष)

वयानुसार या दोघींना सहभाग घेता येत नव्हता, परंतु त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर धावून पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला. त्या दोघीना शासन नियमानुसार बक्षिस मिळू शकत नव्हते, म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकयाडून प्रत्येकी ११०० रुपये, तसेच प्रत्येकी १००० रुपये पोलिस निरीक्षक काळबांडे यांच्याकडून, प्रत्येकी ५०० रुपये एपीआय चव्हाण यांच्याकडून, आणि प्रत्येकी ५०० रुपये प्राचार्य बोनगीरवर यांच्याकडून प्रोत्साहन म्हणून देण्यात आले.