रांगी येथे शिवजयंतीच्या पर्वावर समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा

मा.खा.अशोक नेते यांची उपस्थिती

धानोरा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रांगी येथे नव्याने उभारलेल्या समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. तत्कालीन खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहाचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रांगीच्या सरपंच फालेश्वरी गेडाम, कृ.उ.बा.स. सभापती तथा भाजप नेते शशिकांत साळवे, माजी सरपंच जगदीश कन्नाके, भाजपचे युवा नेते गणेश दहेलकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश कोराम, अर्चना मेश्राम, विद्या कपाट, शशिकला मडावी, ग्रामसेवक बांबोळे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उंदिरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

10 लाखांच्या खर्चातून बांधकाम

2023-24 या आर्थिक वर्षात तत्कालीन खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून या समाज सभागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. याचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि फित कापून करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने रांगी ग्रामस्थांसाठी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक भक्कम वास्तू उपलब्ध झाली आहे.

शिवरायांच्या विचारानुसार समाजाची उभारणी करा- नेते

या प्रसंगी बोलताना मा.खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांनुसार समाजाची उभारणी करणे हे आपले कर्तव्य आहे. माझ्या स्थानिक विकास निधीतून रांगी गावाला समाज सभागृह बांधकामासाठी निधी दिला आणि ते काम पूर्ण होऊन आज लोकार्पण होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या वास्तूचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा हीच अपेक्षा आहे,” असो मनोगत त्यांनी व्यक्त केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर मार्गदर्शन केले. शिवजयंतीनिमित्त बालगोपालांनी सांस्कृतिक सादरीकरण केले. स्थानिक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या गाथेवर आधारित नृत्य आणि गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.