आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने

गडचिरोली : राज्य व केंद्र शासनाकडे असलेल्या ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (गृह) आणि उपमुख्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तसेच ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषण समाप्तीच्या वेळी राज्य शासनाने 29 सप्टेंबर 2023 च्या बैठकीतील प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. तसेच केंद्र सरकारकडे सुद्धा ओबीसींच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व मागण्या तात्काळ मार्गी लागाव्यात याची जाणीव करून देण्यासाठी दिनांक आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 3 या कालावधीत हे आंदोलन होणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला अध्यक्ष मंगला कारेकर, जिल्हा सचिव सुरेश भांडेकर यांनी कळविले आहे.