रस्त्याच्या कामासाठी राखीव वनात जेसीबीने माती व मुरूमाचे खोदकाम

लक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई

कोरची : कोरची तालुक्यातील राखीव जंगल क्षेत्रातून अवैधपणे माती आणि मुरूम काढून बेडगाव ते नाडेकल रस्त्यावर टाकणाऱ्या चंद्रपूरच्या लक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या प्रतिनिधीवर वनविभागाने गुन्हा दाखल केला. या कामात वापरण्यात आलेला जेसीबी सुद्धा जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.ठाकरे, क्षेत्र सहायक एस.एन.राठोड आणि वनरक्षक पी.एम.मगरे यांनी केली.

प्राप्त माहितीनुसार, गडेली क्षेत्राचे वनरक्षक पी.एम.मगरे आणि बेडगावचे क्षेत्र सहायक एस.एन.राठोड हे गस्त करीत असताना कक्ष क्रमांक 457 मध्ये जेसीबीच्या सहाय्याने माती व मुरूमाचे खोदकाम केले जात असल्याचे त्यांना आढळले. रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी जंगलातील माती, मुरूमाचा वापर केला जात होता.

लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीचे हे काम होते. त्यामुळे या कंपनीसह त्यावर देखरेख करणाऱ्या कलामउल्ला हाफिजउल्ला खान यांच्यावर वनसंरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.