हवेत उडणाऱ्या छप्परसह धावली एसटी महामंडळाची बस

अहेरी डेपोच्या बसचा थरारक प्रवास

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी डेपोची एक बस गडचिरोलीवरून निघाल्यानंतर ती अहेरी येथे पोहोचण्याआधीच बसचे छत एका बाजुने खिळखिळे होऊन निघाले. हे छत हवेसोबत उडत असताना समोरच्या बाजुने धावणाऱ्या एका मालवाहू वाहनातील प्रवाशाने हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॅार्ड केले. त्याचा व्हिडीओ बुधवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला.

बसच्या छताला खालील बाजुने दुसरे आवरण असल्यामुळे ही बाब बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना किंवा चालकाला लक्षात आली नाही. त्यामुळे त्याच अवस्थेत ही बस अहेरी डेपोत पोहोचली. या घटनेनंतर अशा पद्धतीने खिळखिळ्या झालेल्या सर्वच बसेस दुरूस्तीसाठी वर्कशॅापमध्ये बोलविण्यात आल्याचे विभाग नियंत्रक सुकन्या सुतावणे यांनी ‘कटाक्ष’शी बोलताना सांगितले.