वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासाठी अमित शाह येणार?

खासदार अशोक नेते यांच्याकडून निमंत्रण

गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करताना खासदार अशोक नेते.

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित आणि नागरी सुविधांसोबत औद्योगिकरणाला चालना देणाऱ्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया झाल्यानंतर आता रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासोबत रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना खासदार अशोक नेते यांनी निमंत्रण दिले.

जिल्हातील वैनगंगा नदीच्या तिरावर एकूण पाच बॅरेज मंजूर झाले आहेत. त्यापैकी चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले असून कोटगलचे काम चालू आहे. तीन बँरेजचे काम लवकरच चालू होणार आहे. कोनसरीतील लोहप्रकल्प आणि जिल्ह्यातील तयार झालेल्या बॅरेजचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती खासदार नेते यांनी शाह यांना केली.

खा.नेते यांनी शाह यांची मंगळवारी नवी दिल्लीत भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आणि लोकसभा क्षेत्रातील विविध कामांना चालना देण्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करून त्या कामांबद्दलचे निवेदन त्यांना दिले. नक्षलग्रस्त, अविकसित आणि केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्रकारची मौल्यवान खनिज संपत्ती आहे. परंतू प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे जिल्ह्याचा सार्वभौम भौतिक विकास झाला नाही. त्यातून बेरोजगारी सुद्धा वाढली असल्याचे खा.नेते यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गडचिरोली जिल्हा जंगलाने व्यापलेला असल्यामुळे येथील रस्ते, रेल्वे लाईन, सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासोबत जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.