गडचिरोली : आदिवासी समाजातील विविध समस्या जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यात आदिवासी महिला संवाद यात्रा काढली जात आहे. 4 ते 11 मार्च या कालावधीत ही यात्रा जिल्हाभर फिरून विविध गावांमध्ये आदिवासी महिलांशी संवाद साधणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
आदिवासी संस्कृती आपणास पहिले माणूस बनवते. जीवसृष्टीला सुजलाम् सुफलाम् करण्याची क्षमत आदिवासी माणसात असताना आम्ही लाचारीने भीक का मागत आहोत? भारतीय राजकीय परिस्थिती आपणास विफलता येण्यासाठी षडयंत्र करत आहे, असा आरोप करत समाजाला सशक्त करण्यासाठी महिलांमध्ये जागृती आणणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे हा या संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे कुसूम आलाम यांनी सांगितले.
गोटुल व्यवस्था मजबूत करणे, गावात कोणी उपाशी राहू नये यासाठी दान कोष व्यवस्था निर्माण करणे, मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक घरातून आर्थिक सहकार्य करण्याची परंपरा सुरू करणे. भाषा व इतिहास ज्ञान जतन करणे, आदिवासी जीवनमूल्ये विकसित करणे, गोंडवाना विद्यापीठात आदिवासी महिला अध्यासन केंद्र स्थापन करुन महिलांच्या कार्यशाळा आयोजित करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाचा व समतेचा विचार दृढ करणे, पं.नेहरुंच्या पंचसुत्रीवर भर देऊन विकासाला गतीशील करणे, म.गांधीजींची आत्मनिर्भर समाज संकल्पना रुजवणे यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या यात्रेचा समारोप दि.11 ला आरमोरी येथे होणाऱ्या आदिवासी महिला साहित्य संमेलनात होणार आहे. या यात्रेदरम्यान नोंदविलेल्या मुद्द्यांचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पत्रपरिषदेला कुसूम अलाम यांच्यासह विनोद मडावी, अमोल कुळमेथे,डॅा.वामन शेडमाके, शालिनी कुंभरे, सुनीता उसेंडी, स्मीता नैताम, प्रमिला रामटेके, सतीश दुर्गमवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.