वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात नाही तर लाच घेण्यातच इंटरेस्ट

मानवाधिकार संघटनेचे प्रणय खुणे यांचा आरोप

गडचिरोली : वनविभागाचे अधिकारी जिल्ह्यातील विकास कामांमध्ये अडथळे आणत आहेत. या अधिकाऱ्यांना लोकांवर कारवाई करण्यापेक्षा लोकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्यातच इंटरेस्ट आहे. यातूनच पेरमिलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकावे लागले. यापुढेही अशा लाचखोर अधिकाऱ्यांना आम्ही धडा शिकवू, असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी दिला आहे.

आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पेरमिलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने १० लाखांच्या लाचेची मागणी करून ५ लाख रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून अटक केली. वास्तविक या आकांक्षित जिल्ह्यात कामे होत नसताना त्यासाठी प्रोत्साहन देण्याएवजी अधिकारी वनकायद्याचा धाक दाखवून केवळ आपला वैयक्तिक स्वार्थ साधत असल्याचा आरोप प्रणय खुणे यांनी केला.

अधिकाऱ्यांनी विकासात्मक कामांमध्ये अडथळे आणू नये. आकांक्षित जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही खुणे यांनी व्यक्त केली.