सीआरपीएफच्या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदही सहभागी

बाईक रॅलीतून केली अभियानाची जागृती

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनतर्फे “हर घर तिरंगा” अभियानाच्या जनजागृतीसाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. याशिवाय सीआरपीएफच्या जवानांनी मोटारसायकल रॅलीतून जनजागृती केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी 13 ते 15 आॅगस्टदरम्यान तिरंगा फडकविण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्याबाबतच्या जनजागृतीसाठी सीआरपीएफनेही मदत करत रॅली काढली. कमांडंट परविन्दर सिंह यांच्या हस्ते, आणि सरस्वती विद्यामंदिराच्या प्राचार्य लक्ष्मी विनायक केटकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली. यात सीआरपीएफचे अधिकारी-जवानांसह सरस्वती विद्या मंदिराचे विद्यार्थी, शिक्षक तथा नागरिकही सहभागी झाले होते.

हा पायदळ मार्च (रॅली) 192 बटालियन मुख्यालयापासून पोलीस कॉम्प्लेक्स पर्यंत आणि तेथून पुन्हा बटालियन मुख्यालयापर्यंत काढण्यात आला.

बाईक रॅलीनेही वेधले लक्ष

192 सीआरपीएफ बटालियनकडून दि.14 आॅगस्टला “हर घर तिरंगा बाईक रॅली” चे सुद्धा आयोजन केले होते. पोलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) अजयकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनात कमांडंट परविन्दर सिंह यांच्या नेतृत्वात जवानांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला. ही बाइक रॅली एमआयडीसी मधील सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापासून गांधी चौक आणि परत एमआयडीसी मध्ये येऊन समाप्त झाली. यातही अनेक अधिकारी आणि जवानांनी सहभाग घेतला.