अन् वाढदिवसाच्या दिवशीच निष्ठूर काळाने झडप घालत त्याला हिरावून नेले

शिवणयंत्र प्रशिक्षकाच्या मृत्यूने हळहळले कोरचीकर

गडचिरोली : कुटुंबातील एखाद्या कर्त्या आणि प्रमुख व्यक्तिचा अचानक मृत्यू झाल्यास त्या कुटुंबासाठी तो मोठा आघात असतो. पण स्वत:च्या कुटुंबासह अनेक महिलांना रोजगार-स्वयंरोजगारासाठी शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या कोमलकुमार बालकदास अंबादे (४३ वर्ष) यांच्या मृत्यूने कोरची परिसरातील नागरिक हळहळले. विशेष म्हणजे कोमलकुमार यांच्या वाढदिवशीच त्यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला.

कोरची येथील शिवणयंत्र प्रशिक्षक, प्रतिष्ठित व्यापारी आणि शेतकरी अशी कोमलकुमार यांची ओळख होती. कुटूंबप्रमुख म्हणून ते दिवाळी सणाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूरवरून विविध प्रकारची खरेदी करून कोरचीला कारने येत होते. गावाजवळ येताच ब्रेन हॅमरेज होऊन त्यांच्या डोक्यातील मेंदूची मुख्य नस फाटली. त्यामुळे डोक्यात रक्तस्राव होऊन ते कोमात गेले. प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूरच्या खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले.

सात दिवस दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत अखेर उपचारादरम्यान आठव्या दिवशी, म्हणजे १६ नोव्हेंबर या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अंबादे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सरसावलेल्या त्यांच्या मित्रपरिवार आणि आप्तेष्टांवर कोमलकुमारला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली.

अनेक महिलांना दाखविला स्वयंरोजगाराचा मार्ग

कोमलकुमार अंबादे हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेकसा गावातील रहिवासी आहेत. लग्नानंतर कोरचीमध्येच वास्तव्य करू लागले होते. त्यांनी सुरुवातीला एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर शिवणकाम शिकून संस्था सुरू केली. शिवणयंत्र प्रशिक्षक बनून त्यांनी अनेक महिला व मुलींना कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले व त्यांना आत्मनिर्भर बनविले. सामाजिक कामातही ते नेहमी अग्रेसर राहात होते. अनेक गरीब कुटुंबांना त्यांनी मदत केली. हसमुख व मिळावू स्वभावामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. पण अखेर काळाने त्यांच्यावर झडप घातली.

मृतक कोमलकुमार अंबादे यांच्यामागे पत्नी आशा, १५ वर्षाची मुलगी गुणगुण, १० वर्षाचा मुलगा रिधम, आई-वडील, एक लहान भाऊ तथा बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी कोचीनारा येथील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले. ते लोकमतचे कोरची तालुका प्रतिनिधी लिकेश अंबादे यांचे चुलत बंधू होत.