पेरमिलीत झाला ५१ गावातील आदिवासी नागरिकांचा पारंपरिक दसरा

अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पूजन

अहेरी : शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरीचा दसरा झाल्यानंतर येथील ज्योत नेऊन अहेरी इस्टेटमधील अनेक भागात आदिवासी बांधव दसरा उत्सव साजरा करतात. त्याच परंपरेप्रमाणे अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विधीवत पूजन करून आदिवासी बांधवांनी गुरूवारी दसरा साजरा केला. यावेळी पेरमिली पट्टीतील ५१ गावांतील आदिवासी बांधव उपस्थित होते.

आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना अम्ब्रिशराव म्हणाले, आदिवासी समाज हा देशातील मुळ निवासी आहे. आपल्या क्षेत्रातील जल, जंगल, जमिनीवर त्यांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने आपसातील मतभेद दूर करून एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. असे झाल्यास आपल्या समाजाला प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही. कोणाला काहीही समस्या असेल त्यांनी निःसंकोचपणे माझ्याकडे यावे, सर्वांचे समाधान करणे माझी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

रात्री आदिवासी पारंपरिक नृत्य तथा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पेरमिली पट्टीतील शेंड्या, गाव पटेल, गाव भूमिया यासह परिसरातील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.