प्रतीक्षा संपली, देवदाच्या नाल्यावर 18 कोटींतून होणार पुलाची उभारणी

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

मुलचेरा : तालुक्यातील देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. गुरुवारी (२१ डिसेंबर) राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आ.डॉ.देवराव होळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, तहसीलदार चेतन पाटील, बिडीओ एल. बी. जुवारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, देवदाचे सरपंच केसरी पाटील, कंत्राटदार नितीन वायलालवार, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, मुलचेरा नगरपंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, भाजपच्या बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, रेगडीचे सरपंच, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे इतर अधिकारी व कर्मचारी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलचेरा आणि चामोर्शी या दोन तालुक्यांना विभागणाऱ्या दिना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जीव धोक्यात टाकून जल प्रवास करावा लागत होता. या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती. महायुती सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या भागातील नागरिकांची अडचण लक्षात आणून देत पूल बांधकामासाठी निधी मंजूर करावा ही मागणी रेटून धरली. अखेर नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

तीन तालुक्यातील नागरिकांना दिलासा

जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना हा अत्यंत शॉर्टकट रस्ता आहे. एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिक बारमाही याच रस्त्याचा वापर करतात. एटापल्लीवासीयांना जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी जवळपास ७० किलोमीटर अंतर कमी पडते. एवढेच नव्हे तर गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून ये-जा करणारे कर्मचारी आणि इतर कामासाठी येणारे नागरिक सुद्धा याच मार्गाचा वापर करतात. पावसाळ्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता या नदीवर पुलाचे बांधकाम होत असल्याने मुलचेरा, एटापल्ली आणि चामोर्शी या तीन तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.