संसदेतील खासदारांच्या निलंबनाविरूद्ध इंडिया आघाडीकडून तीव्र निदर्शने

गडचिरोलीच्या गांधी चौकात जमले विरोधक

गडचिरोली : मोठ्या प्रमाणावर विरोधी खासदारांवर संसदेतून करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचा इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात तीव्र निदर्शने करत निषेध नोंदविला. सरकारने हुकूमशाही प्रवृत्तीने ही कारवाई केली असे म्हणत लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने निदर्शने केली. यात इंडिया आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (उबाठा ), भारतीय कॅाम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद सहभागी झाले होते.

निलंबित करण्यात आलेल्या १४१ खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, तर ४६ सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा ठपका निरर्थक असल्याचे सांगत सर्व खासदारांचे निलंबन मागे घेऊन भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे संरक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश कोपूलवार, देवराव चवळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री वेळदा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी हेमंत डोर्लीकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, गौतम मेश्राम, केशवराव सामृतवार, सुरेखा बारसागडे, प्रतिक डांगे, शेकाप खजिनदार शामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, आकाश आत्राम, भाकपचे संजय वाकडे, आपचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष कोटकर, हेमराज हस्ते, भूपेश सावसाकडे, संजय जीवतोडे, शाम धोपटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष प्रेमीला रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.