चातगावच्या डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजमध्ये एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून जनजागृती

भविष्यातील जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन

गडचिरोली : समाजात वाढलेले भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूरच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. याअंतर्गत धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजमध्ये एसीबी गडचिरोलीच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भविष्यातील जबाबदार नागरिक बनताना भ्रष्टाचारापासून स्वत:ला आणि समाजाला कसे दूर ठेवायचे यावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

कॅालेजमधील स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून एसीबीचे पोलिस उपअधीक्षक श्रीधर भोसले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कॅालेजचे संस्थापक अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी मार्गदर्शन करताना डीवायएसपी भोसले यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत एसीबी, ईडी, सीबीएस यांची माहिती देऊन शोषण थांबवण्यासाठी तक्रार कुठे करायची, कशी करायची याची माहिती दिली. तुम्ही भविष्यातील डॅाक्टर, नर्स आणि जबाबदार नागरिक होणार हे लक्षात घेऊन आपले हक्क, शासकीय नोकरदाराचे कर्तव्य याची माहिती घ्या आणि समाजाला भ्रष्टाचारापासून दूर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मार्दर्शन करताना डॅा.प्रमोद साळवे म्हणाले, पूर्वी कुठे एसीबीने कारवाई केली तर ती गोष्ट चर्चेचा विषय होत असे. पण आता भ्रष्टाचाराचे वाढलेले स्वरूप पाहता भ्रष्टाचार शिष्टाचार झाला की काय, असे वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्ये ओळखून समाजाला लागलेली ही कीड दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला एसीबीचे राजेश पद्मगिरवार, संदीप घोडमारे, संदीप उडान, सुनील पेड्डीवार तसेच कॅालेजतर्फे पुजा मडावी, सीमरन शेख, प्रिया मेश्राम, गुरूदेव शेडमाके, अजय पद्मगिरवार हेसुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनतर्फे शुभांगी गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन असोसिएशनच्या अध्यक्षा सानू कोंडागूरला यांनी केले. कार्यक्रमासाठी शितल पदा, ट्रिंकल सयाम, विभा निकुरे, दिव्या मोरे, सानिया सडमेक, रविना भक्तू, सोनाली धुडसे, आंचल मेश्राम, अंजली चंद्रागडे, पल्लवी बोरकर, इंदू चिपेली, आकांक्षा आखाडे, आकांक्षा चौधरी, काजल गावडे, ममता तीर्थगिरवार, किरण दुग्गा, स्विटी नरोटे, अर्पणा तुलावी, पुनम दट्टी, पुजा रामटेके, मालती सिकंदर, चेतन मडावी, यतिंद्र लिंगावार, प्रथम रामने, सचिन भोयर, आंचल दुर्गे, साक्षी मडावी, राखी मोंगरकर, प्राची पिपरे, प्रशांत कोंडागुरला, विक्की पोहरकर यांनी सहकार्य केले.