‘चेन्ना’ प्रकल्पासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बैठक

वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त होणार?

अहेरी : मागील ४० वर्षांपासून रखडलेल्या आणि मुलचेरा तालुक्यासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग सभागृहात विविध विभागांची बैठक पार पडली. त्यात चेन्ना प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यात आली.

१३ मे १९७७ रोजी १.८२ कोटींच्या चेन्ना सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार होता. १९८०-८१ पर्यंत या प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम झाले होते. त्यानंतर वनकायद्याच्या अडथळ्यामुळे बांधकाम ठप्प पडले. २०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यावर वनविभागाकडून एफएआर प्रमाणपत्र मिळाल्यावर या सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लागणार अशी आशा होती. मात्र चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या काही सुटली नाही.

त्यामुळे पुन्हा एकदा माजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुलचेरा येथील शिष्टमंडळ घेऊन नागपूर गाठले आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चेन्ना प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. वन विभाग पूर्णपणे सहकार्य करणार असून पाहिजे तो निधी उपलब्ध करून देणार, मात्र सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात महत्वाची बैठक होणार असून हा प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

या बैठकीला अम्ब्रिशराव आत्राम, वनविभागाचे प्रधान सचिव नरेश झुरमारे, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रामटेके, गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेश कुमार, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काही पदाधिकारी उपस्थित होते.