भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी ‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती

एफडीए मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची माहिती

xr:d:DAF1OXqznB4:4,j:6055500096363613516,t:23112609

गडचिरोली : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, त्या प्रयोगशाळांची क्षमता मर्यादित असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्ल‍िक प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

आ.मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री धर्मरावबाबा म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.

भेसळयुक्त दुधाच्या संशयातून एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री आत्राम यांनी सांगितले.