महाशिवरात्री निमित्ताने खासदार नेते यांची चपराळा देवस्थानला भेट व पुजा

येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह बांधणार

आष्टी : महाशिवरात्रीच्या पर्वावर खासदार अशोक नेते यांनी चपराळा येथे जाऊन पूज्य संत कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन हनुमान मंदिर, प्रशांत धाम येथे विधीवत पुजाअर्चना केली. याप्रसंगी चपराळा देवस्थानच्या भाविक भक्तांसाठी खासदार अशोक नेते यांच्या विकास निधीतून स्वच्छतागृहासाठी २० लाख रुपये मंजूर करण्याचे जाहीर केले.

चपराळा देवस्थान मंदिर कमिटीने खासदार नेते व खा.नेते यांच्या अर्धांगिनी अर्चना नेते यांचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खा.नेते यांनी समस्त भाविकांना महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, चपराळा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय पंदिलवार, पुष्पा लाडवे, तसेच मोठ्या संख्येने चपराळा मंदिरातील भाविक उपस्थित होते.