धारदार शस्राने हल्ला करून २० वर्षीय युवतीचा झाेपेत रहस्यमय खून

सकाळी उघडकीस आली घटना

सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे रात्री झोपेतच एका २० वर्षीय तरुणीचा गळ्यावर धारदार शस्राने वार करून खून करण्यात आला. विशेष म्हणजे घरात सदर युवतीचा भाऊ आाणि आई झोपलेले असताना त्यांना या खुनाचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी उठल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे हा रहस्यमय खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

ओलिता रामय्या सोयाम (२० वर्ष) असे मृत युवतीचे नाव आहे. गुरुवारच्या रात्री नेहमीप्रमाणे ती घरातील खोलीत झोपलेली होती. यावेळी तिचा भाऊ बुचया रामया सोयाम (२८ वर्ष) हा घराच्या आवारातच झोपलेला होता. तसेच आईसुद्धा दुसऱ्या खोलीत झाेपलेली होती. शुक्रवारी सकाळी भाऊ बुचया झाेपेतून उठल्यानंतर अंथरून घरात नेऊन ठेवण्यासाठी गेला असता त्याची बहिण खाटेवर निपचित पडलेली दिसली. तिच्या खाटेखाली रक्त सांडलेले होते आणि मागचा दरवाजा उघडा होता. त्याने ओलिताला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती मरण पावली होती. घाबरून त्याने आरडाओरड करत आईला उठविले. तसेच गावात असलेला मामाचा मुलगा सुधाकर आत्राम यालाही बोलवून आणले. दोघांनी बारकाईने पाहिले असता ओलिताच्या हनुवटीच्या खाली गळ्यावर, मानेवर धारदार शस्राने वार केलेला दिसला.

हा खून घरातच झाला असेल तर ओलिताच्या ओरडण्याचा आवाजही कोणाला कसा आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी सिरोंचा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धविले करत आहे.