गडचिरोली : समृद्ध जाणिवांनी वर्तमानाचा वेध घेत अर्थपूर्ण भविष्याच्या वाटा शोधू पाहणारी सर्जनशील तरुणाई एकत्र यावी, आणि त्यांच्या चर्चेतून विचारमंथन व्हावे या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठात आजपासून दोन दिवस राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. आज (बुधवारी) सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीनंतर 10.30 वाजता उद्घाटन सत्र होणार आहे.
जळगाव येथील युवा अभिनेते हर्षल पाटील हे उद्घाटक, तर पुण्याचे युवा साहित्यिक अक्षय चंदेल हे संमेलनाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे हे स्वागताध्यक्ष तर प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे हे सहस्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर आणि लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे उपस्थित राहतील.
उद्घाटन सत्रानंतर दुपारी 1.30 वाजता ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 2.30 वाजता अभिरूप न्यायालय होणार असून त्यात साहित्यिक, निवेदक किशोर बळी हे आरोपी म्हणून आपली बाजू मांडतील. दुपारी 3.30 वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुपारी 4.30 वाजता ‘वाचायचे का? काय? कसे?’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता मराठी शायरी आणि कवितांची मैफील रंगणार आहे. त्यात सुप्रसिद्ध युवा साहित्यिक प्रा.ज्ञानेश्वर गटकर हे सादरीकरण करतील. सायंकाळी 7 वाजता हर्षल पाटील हे ‘नली’ या एकलनाट्याचा प्रयोग सादर करतील.
दि.6 रोजी ‘अभिजात मराठी आणि बोलीभाषा’ या विषयावर सकाळी 10 वाजता परिसंवाद होणार आहे. 11 वाजता विद्यार्थ्यांचे कविसंमेलन, तर 12 वाजता ‘साहित्य संमेलने आणि वर्तमानाचा वेध’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर पर्यावरण जागृती या विषयावर व्याख्यान आणि दुपारी 2 वाजता गझल मुशायरा या कार्यक्रमात विविध ठिकाणचे गझलकार आपल्या गझला सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सुप्रसिद्ध सरोदवादक विजया कांबळे (कोल्हापूर) यांचा स्वरांगण हा कार्यक्रम सादर होईल.
सायंकाळी 4.30 वाजता समारोप होणार असल्याचे कुलसचिव डॅा.अनिल हिरेखण, युवा साहित्य संमेलनाच्या समन्वयक डॅा.सविता गोविंदवार यांनी सांगितले.