‘त्या’ युवतीवर अत्याचारच झाला, पोलिसांकडून आरोपीला अटक

शुद्धीवर आल्यानंतर घेतले बयान

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या शिवणी येथील तरुणी गावाबाहेर बेशुद्धावस्थेत सापडली होती. नागपूर येथील उपचारादरम्यान ती शुद्धीवर आल्यानंतर मंगळवारी तिचे बयान घेण्यात आले. त्यानुसार तिला निर्दयीपणे मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

अनिल संतू उसेंडी (23 वर्षे), रा.दोबे, जि.नारायणपूर (छ.ग.), हल्ली मुक्काम शिवणी असे आरोपीचे नाव आहे. कसून चौकशी केल्यानंतर या आरोपीने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, 2 मार्च रोजी सायंकाळी पीडित युवती गावाबाहेर शौचास गेली असताना, आरोपीने सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तिला निर्दयीपणे मारहाण करुन तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर ती तिथेच बेशुद्ध होऊन पडून होती. शोधाशोध सुरू झाल्यानंतर ती सापडली. तिला आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर 3 मार्च रोजी नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश व इतर वरिष्ठ अधिका­ऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस स्टेशनची समांतर तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता. उपचारादरम्यान दि.4 रोजी दुपारी सदर तरुणी आपले बयान देण्यासाठी सक्षम असल्याचे वैद्यकिय अधिका­ऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर बयान नोंदवून घेण्यात आले. तिच्या सांगण्यानुसार आरोपीविरुद्ध कलम 64 (1), 64 (2) (एल), 115 भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

रेखाचित्रावरून घेतले आरोपीला ताब्यात

बयानादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलिसांनी तयार केले. त्यानुसार गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळवत आरोपी अनिल उसेंडी याला ताब्यात घेतले होते. ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शाखेचे पो.नि. अरुण फेगडे, गडचिरोली ठाण्याचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे आणि अंमलदारांनी केली.