महामार्ग स्विकारताना आधी आपली पायवाट बळकट आणि स्वच्छ करा-डॅा.शोभणे

दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गडचिरोली : साहित्यात आपली ओळख निर्माण करताना लेखन, वाचन, चिंतन, मनन आणि समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टि असणं अत्यंत महत्वाचं आहे. समाजातील प्रश्नांची मांडणी आपल्या साहित्यातून केली पाहिजे. साहित्यिक प्रवासात पुढील महामार्ग स्विकारताना आधी आपली पायवाट अत्यंक बळकट आणि स्वच्छ करा, असे आवाहन करत, हे काम आजची पिढी जबाबदारीने करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी बुधवारी गडचिरोलीत व्यक्त केला. गोंडवाना विद्यापीठातर्फे आयोजित दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने साहित्यव्रती गो.ना.मुनघाटे साहित्यनगरीत (सुमानंद सभागृह) युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा साहित्यिक डॅा.किशोर कवठे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे ग्रंथदिंडी आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, रासेयोचे संचालक डॉ.श्याम खंडारे, साहित्य अभ्यासक प्रा.ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मिनाक्षी वाळके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्घाटक डॅा.रविंद्र शोभणे म्हणाले, अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांच्या लेखनाची छाप तारुण्यातच उमटविली आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श घेत वयाच्या चाळीशीपर्यंत तरुणांनी आपल्या साहित्यिक कलाकृती समृद्ध कराव्यात. साहित्य निर्मिती करताना कोणत्यातरी मोठ्या साहित्यिकाचा आपल्यावर प्रभाव असतो, तो असणे साहजिकही आहे. पण यातून बाहेर पडत आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आपल्या साहित्यातून उभं करायचं असतं, असं डॅा.शोभणे म्हणाले.

गडचिरोली गौरव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुप्रसिद्ध कवी प्रा.पुनीत मातकर यांच्या ‘विणीचा हंगाम’ या कवितासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक युवा साहित्य संमेलनाच्या समन्वयक प्रा. डॉ.सविता गोविंदवार, संचालन करिष्मा राऊत हिने तर आभार प्रा.अमोल चव्हाण यांनी मानले. या संमेलनाला श्रोते म्हणून युवा वर्गाकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे ही बाब सर्वांना खटकत होती.

साहित्य माणसे जोडणारा महत्वाचा दुवा : डॉ.कवठे

मराठी साहित्याला खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे केवळ एकाच विचारधारेचे साहित्य न वाचता सर्वसमावेशक असावे. तसं पाहता आता वाचन कमी झालेले आहे. त्यामुळे वाचनाकडे तरुणांचा कल कसा वाढेल, वाचन संस्कृती आपल्याला कशी वृद्धिंगत करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे साहित्य माणसं जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे, असे डॉ.किशोर कवठे यावेळी बोलताना म्हणाले.

जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज : डॉ.अभय बंग

आजच्या युवकांपुढे बरीच आव्हाने आहेत. काळ झपाट्याने बदलत आहे. रंजनवादी साहित्यापलिकडे आता जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी यावेळी व्यक्त केले.

युवा साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी कटीबद्ध : डॉ.बोकारे

युवा साहित्य संमेलन गोंडवाना विद्यापीठाकडून आयोजित करणे हा नवा अनुभव आहे. पुढील काळात युवा साहित्य संमेलनाची परंपरा कायम ठेवली जाईल. गोंडवना परिसरातील नव्या पिढीतील लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देणार असून विद्यापीठ यासाठी कटीबद्ध राहील, असे मत स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.