पुनर्नियुक्ती घेणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वागत करून उपहासात्मक आंदोलन

पेन्शन बंद करण्याची आझाद पार्टीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यात गाजत असलेल्या निवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी भरतीविरोधात आझाद समाज पार्टीने उपहासात्मक आंदोलन केले. समुपदेशनाकरीता आलेल्या निवृत्त शिक्षकांना पुष्प देत व आवाहन पत्र देऊन त्यांचे आझाद समाज पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांवरील रिक्त शिक्षकांच्या जागांवर निवृत्त शिक्षकांचे अर्ज घेण्यात आले. त्यांना समुपदेशनाकरीता तसेच इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलविले असताना आझाद समाज पार्टीने जिल्हा परिषदेच्या दोन्ही गेटवर येणाऱ्या निवृत्त शिक्षकांना थांबवून त्यांच्यापुढे बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांनी आपली व्यथा मांडली. त्यांना पुष्प देऊन स्वागत केले. त्याचसोबत बेरोजगारांची नोकरी हिसकावल्याची जाणीव त्यांना करून दिली.

पेन्शन भेटुनसुद्धा पुनर्नियुक्ती मागत असल्यामुळे निवृत्त शिक्षकांना भिक म्हणून 10 रुपये वाटण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सभागृहात जाऊन आवाहनाची पत्रकेसुद्धा वाटण्यात आली.

याप्रसंगी आझाद समाज पार्टीचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, शोभा खोब्रागडे, आशिष गेडाम, शाम कुळमेथे, किरण भाणारे, श्याम कुळमेथे, सुखरूप पोरेती, अनिल कतलामी, सुप्रिया नैताम, विजय देवतळे, घनश्याम खोब्रागडे, एकनाथ लेनबाडे, लीला दरडमारे, सतीश दुर्गमवार, सुरेश बारसागडे, संदीप पाल, किरण बावणे तसेच विविध तालुक्यातील शिक्षक, पात्र उमेदवार उपस्थित होते.