खासदार अशोक नेते यांनी घेतल्या तेलंगणात कार्यकर्त्यांच्या बैठका

तीन विधानसभा निवडणुकीची जबाबदारी

गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती सेलचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्यावर निर्मल जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदार संघांची जबाबदारी आली आहे. त्यादृष्टिने त्यांनी खानापूर, निर्मल आणि मुधोली या तिन्ही विधानसभा क्षेत्रात भाजपचे संघटन वाढण्यासाठी पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

या तिन्ही विधानसभेत फिरून त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. संघटन व नियोजनबद्ध कार्यपद्धती यावर निवडणूक कशी जिंकता येईल याकरिता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम करावे भाजपचा विजय नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ठिकठिकाणी खा.नेते यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार माहेश्वर रेड्डी यांच्या वॅार रूमलाही त्यांनी भेट दिली. याप्रसंगी प्रामुख्याने विविध जिल्ह्यांचे भाजप पदाधिकारी उपस्थित होते.