गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२३’ मंगळवार, दि.१७ पासून तीन दिवस शहरातील आरमोरी मार्गावरच्या सुमानंद सभागृहात रंगणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॅाडेल अलिशा मेलानी हिच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे अलिशा ही गोंडवाना विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, आयोजक तथा विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी संचालक डॉ.प्रिया गेडाम आदी उपस्थित राहतील.
हा महोत्सव १७ ते १९ ऑक्टोबर असा तीन दिवसीय चालणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर लगेच सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, मूकनाट्य, नकला , शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, समूहगीत, शास्त्रीय तालवाद्य, संगीत शास्त्रीय ताणवाद्य, पाश्चिमात्य गायन, लोकसंगीत वाद्यवृंद, वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, स्थळ चित्र, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र, माती कला, चिकट कला, एकांकिका, प्रहसन, शॉर्ट फिल्म, स्पॉट फोटोग्राफी या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयाचे जवळपास ७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या इंद्रधनुष्य महोत्सवाचा समारोप १९ ऑक्टोबरला होणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि या कार्यक्रमाच्या आयोजक डॉ.प्रिया गेडाम यांनी केले आहे.