शेवटचा दम मारत वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांचे भूमिपूजन

मोठा निधी मिळाल्याने गावागावात आनंद

अहेरी : तालुक्यातील वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या विविध गावांमध्ये लाखोंच्या निधीतून विकास कामे केली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी या कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांच्याहस्ते करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी या दोन ग्रामपंचायतअंतर्गत गावांमधील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे विकास कामांची मागणी करत यादी दिली होती. त्यांच्या मागणीनुसार गावात विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, गावांचा विकास व्हावा या हेतूने भाग्यश्रीताईंनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निधीची मागणी रेटून धरली.धर्मरावबाबा यांनी विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे मार्गी लावण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार आणि कार्यकर्त्यांनी या दोन ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ठ विविध गावांत भेटी देऊन कामांचे भूमिपूजन केले. यावेळी किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मखमुर शेख, हनमंतू आडे, दिलीप सोनूले, तसेच किष्टापूर, नवेगाव, वेलगुर, शिवलिंगपूर, तानबोडी आदी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका अध्यक्षांना भूमिपुजनाचा बहुमान दिल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.