अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात आत्राम घराण्यातील तीन सदस्य एकमेकांविरूद्ध लढत आहेत. मात्र आपली लढाई सर्वांसोबत आहे. माझे पुतणे मनाने भाजपचे कधीच झाले नाही. वडील आणि आजोबांपासून ते नाग विदर्भ आंदोलन समितीचेच होते. अपक्ष लढण्याची त्यांची परंपरा आजही सुरू आहे. त्यामुळे त्यांना भाजपचे बंडखोर म्हणता येणार नाही, अशी टिका धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.
भाजप आणि काँग्रेसमधील बंडखोरीमुळे या मतदार संघातील निवडणुकीवर काय फरक पडेल, असा प्रश्न केला असताना ते बोलत होते.
राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले धर्मरावबाबा आत्राम यांना पुतणे अम्ब्रिशराव आत्राम, तसेच कन्या तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्याविरूद्ध एकाचवेळी लढावे लागत आहे. त्याबद्दल बोलताना ना.आत्राम यांनी आमच्या कन्येने खूप घाई केली. पाच वर्ष थांबली असती तर काही बिघडत नव्हते. पण आता मी हयात असेपर्यंत भाग्यश्री निवडून येणार नाही, अशा शब्दात त्यांनी लेकीवर असलेली नाराजी व्यक्त केली.