वृत्त विश्लेषण / मनोज ताजने
गडचिरोली : जेमतेम सहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षातून राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या गडचिरोलीतील उच्चशिक्षित डॉ.नितीन आणि डॉ.चंदा कोडवते या दाम्पत्याने शुक्रवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक पाहता डॉ.कोडवते दाम्पत्याची काँग्रेसमधील ‘सक्रियता’ पाहता त्यांचा भाजपमधील पक्षप्रवेश काँग्रेस किंवा भाजपसाठी दखलपात्र आहे का? असा प्रश्न गडचिरोलीकरांना पडला आहे.
एखादी निवडणूक लढली म्हणजे ती व्यक्ती लीडर होत नाही. लीडर होण्यासाठी नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व या गुणांची सांगड घालावी लागते. पण हे गुण प्रभावीपणे नसतानाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कृपेने डॉ.चंदा कोडवते यांना गडचिरोली मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळाले आणि डॉ.कोडवते यांच्या डोक्यात लीडरकीची हवा गेली. या दाम्पत्याला आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी थेट प्रदेश काँग्रेसचे सचिवपदही काँग्रेसने बहाल केले, पण त्यांना शुभेच्छांचे होर्डिग्स लावण्यापलीकडे काहीही जमले नाही. त्यामुळे गेल्या 4-5 वर्षात साहजिकच पक्षातील त्यांचे महत्व कमी होऊन ते काहीसे अदखलपात्र झाले. अशाही स्थितीत लोकसभा लढविण्याचे स्वप्न पाहण्याची हिंमत त्यांनी दाखवली. पण लोकसभा तर दूर, पुढे विधानसभेची तिकीटही मिळते की नाही याची शाश्वती त्यांना नव्हती. मिळालेच तर जिंकण्याचा विश्वासही नसावा. त्यामुळेच कदाचित त्यांनी गुपचूपपणे काढता पाय घेत भाजपच्या तंबूत जाऊन वाहत्या प्रवाहासोबत पोहणे पसंत केले. खासदार अशोक नेते यांनी त्यांच्यातील अस्वस्थतेला नवी वाट देऊन आणखी एक डॅाक्टर (दाम्पत्य) भाजपच्या गळाला लावले.
सूत्रानुसार, पक्षात प्रवेश करण्यासाठी डॉ.कोडवते दाम्पत्याला भाजपने कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्यामुळे काहीतरी मिळण्याचे आश्वासन घेऊनच त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र कोणत्याही गोष्टीचे मार्केटिंग करण्यात पारंगत असलेल्या भाजपने निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत प्रसार माध्यमांसमोर कोडवते दाम्पत्याचा पक्षप्रवेश केला. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे माध्यमांसमोर वदवून घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाराष्ट्रभर जो संदेश द्यायचा तो दिला. वास्तविक कोडवते दाम्पत्याच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेसचे कोणते नुकसान किंवा पक्षप्रवेशाने भाजपचा मोठा फायदा होईल एवढे मोठे ते निश्चितच नाही, पण भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे आणि काँग्रेसपासून लोक दूर जात आहेत हे दाखविण्याची संधी भाजपने सोडली नाही.
आता भाजपसारख्या मोठ्या आणि सत्ताधारी पक्षाचे घटक झाल्याचा आनंद आणि समाधान कोडवते दाम्पत्याला काही दिवस निश्चितपणे वाटेल. मात्र राजकीय भवितव्य घडवायचे असेल, थेट खासदारकी, आमदारकीची सुप्त इच्छा पूर्ण करायची असेल, तर भाजपमध्येच काय, कोणत्याही पक्षात असले तरी स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. कोणतीही अपेक्षा ठेवून भाजपमध्ये आलो नाही, असे डॅा.कोडवते म्हणत असले तरी पुढेमागे संधी मिळेल अशी आशा त्यांना नक्कीच असणार. तशी आशा, अपेक्षा असणे गैर नाही. पण त्यासाठी योग्य ती तयारी त्यांना करावी लागेल. स्वत:ला झोकून देऊन आणि पेशन्स ठेवून काम करावे लागणार आहे. ज्या कलेची, गुणांची कमतरता आहे ते गुण विकसित करण्याची आणि त्यात पारंगत होण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा भाजपमध्येही ‘अदखलपात्र’ होण्याची पाळी त्यांच्यावर येईल, आणि राजकीय वाट सोडून पुन्हा रुग्णसेवेच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरणार नाही.