चामोर्शी : शालेय शिक्षण विभागाने 2024-2025 साठी नवीन संचमान्यता निकष जाहीर केले आहेत. यात वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजुर होते, मात्र नवीन निकषानुसार 21 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना वर्ग 4 पर्यंत एकाच शिक्षकाच्या पदाला मंजुरी राहणार आहे. यामुळे दुर्गम भागातील वाडी-वस्तीवरील शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार असल्याने हा जाचक बदल रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी सांगितले.
नवीन शिक्षक संचमान्यता निकषात राज्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चार वर्गासाठी एक शिक्षक मिळणार आहे. दुर्गम वाडी-वस्तीवरील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना चार वर्गांना अध्यापन करत असताना सर्व प्रशासकीय कामकाजही करावे लागते. आजपर्यंत पटाच्या अटीशिवाय या शाळांमध्ये दोन शिक्षकांची पदे मंजूर होती. नवीन संचमान्यतेनुसार एक नियमित शिक्षक व दुसरा सेवानिवृत्त शिक्षक अशी पदे मंजूर केली आहेत. जे युवा शिक्षक दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या भविष्याचा विचारही करणे आवश्यक आहे. या नव्याने आलेल्या अटी बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेकडून शासनाकडे मागणी करणार असल्याचे सुरावार यांनी सांगितले.
नवीन संचमान्यता निकष 15 मार्च 2024 पासून अंमलात आले आहेत. यात द्विशिक्षकी शाळांमध्ये 60 पटसंख्येसाठी किमान दोन शिक्षक आहेत. तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान 16 मुलांची अधिक आवश्यकता आहे. हे तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान 76 मुले आवश्यक आहेत. पटसंख्या 10 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक सेवानिवृत्त शिक्षक मिळणार आहे. सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक दिल्या जाणार आहे. इयत्ता सहावी ते आठवी मध्ये एकच वर्ग असल्यास 35 पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे 53 पटसंख्येनंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तिसऱ्या शिक्षकासाठी किमान 88 पटसंख्या लागणार आहे. यासह अनेक निकष संचमान्यतेच्या शासन निर्णयामध्ये आहेत.
या नव्याने आलेल्या अटी बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून शासनाकडे मागणी करून राज्यातील सर्व शिक्षक संघटनांना एकत्र करत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही संतोष सुरावार यांनी सांगितले.