आलापल्लीच्या शिबिरात एकाच छताखाली विविध तज्ज्ञ डॅाक्टरांकडून तपासण्या

प्रतिसाद पाहून कळले महत्व- ना.धर्मरावबाबा

आलापल्ली : अहेरी परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील क्रीडा संकुल मैदानात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या शिबिराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून अशा आरोग्य शिबिराची किती आवश्यकता होती हे कळले, अशी भावना यावेळी बोलताना अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.

या शिबिराचे उद्घाटन ना.आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडन्ट एम. एच. खोब्रागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सरपंच शंकर मेश्राम, राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, डॉ.भूषण भडके, डॉ.धुर्वे, डॉ.गोपाल रॉय, डॉ.चरणजितसिंह सलुजा, कैलास कोरेत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.धर्मरावबाबा म्हणाले, विविध आजारांचे योग्य निदान होऊन त्वरित उपचार व्हावे यासाठी एकाच छताखाली व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा अशा मोठ्या शिबिराचे आयोजन या भागात करण्यात आल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे बाबांनी आभार मानले.

माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गम भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या शिबिरातील तपासणीत काही गंभीर आजार आढळल्यास त्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक आठवड्यापासून या शिबिराचे नियोजन सुरू होते. खेड्यापाड्यातील नागरिकांना आलापल्ली येथे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, रायुकाचे अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, ग्रापं सदस्य मनोज बोलूवार, सोमेश्वर रामटेके, सुमित मोतकुरवार, महेश येरावार आदींनी परिश्रम घेतले.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

या आरोग्य शिबिरात नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटल, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेद्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), लॉयड्स काली मेमोरियल हॉस्पिटल हेडरी, लॉड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आणि सलुजा नर्सिंग होम आलापल्ली येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यात रक्तदाब, ब्लड शुगर, किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे सर्व आजार, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखडयाचे आजार, कान, नाक, घसा, मणक्याचे आजार, खाज, दमा, मानसिक रोग, दातांचे आजार, कॅन्सर रुग्ण तसेच मानसिक आजारांचे रुग्ण यांच्या तपासण्या करण्यात आल्या. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या नामांकित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.