जिल्ह्यात ८० टक्के अपघात दुचाकीस्वारांचे, तरीही हेल्मेटचा वापरच होत नाही

ऐका काय म्हणतात परिवहन अधिकारी

गडचिरोली : जिल्ह्यात परिवहन विभागाकडून १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यात सुरक्षित प्रवासासंदर्भात विविध प्रकारचे प्रबोधन करून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत ९९ टक्के लोक हेल्मेटचा वापरच करत नसल्याचे तथ्य समोर आले. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात एकूण अपघातांपैकी ८० टक्के अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. तरीही स्वत:ची जीवित हाणी टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याबाबत दुचाकीस्वार गंभीर नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.

रस्ता सुरक्षा अभियानात महिनाभर वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांची तपासणी करून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. यादरम्यान ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेटची तपासणी, विद्यार्थ्यांसाठी परिवहन विभागाच्या नियमांवर आधारित प्रश्नोत्तरे, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

आरमोरी येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य लालसिंग खालसा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी सांगून सर्वांना रस्ता सुरक्षा का आवश्यक आहे, याबाबत प्रबोधन केले.

यावेळी विद्यार्थ्यांकरिता रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात, तसेच आरमोरी बस स्टँडमध्ये पथनाट्य सादर करुन रस्ता सुरक्षेवर जनजागृती केली. मोटार वाहन निरीक्षक गोपाल धुर्वे व किरण शिंदे यांनी रस्ता सुरक्षेविषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाची सुरूवात सहा. मोटार वाहन निरीक्षक ओ.पी. मेश्राम यांनी करुन रस्ता सुरक्षेची आवश्यकता सांगितली. या कार्यक्रमासाठी गौरी राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.