देसाईगंज : स्थानिक पातळीवर जनतेचे हित जोपासण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सरपंच परिषद मुंबईच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचा स्व.यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, पद्मश्री पोपटराव पवार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
ग्रामीण भागात चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून यावेळी आ.गजबे यांच्यासोबत आ.बच्चू कडू (अचलपूर), आ.अभिमन्यू पवार (औसा), आ.सुमन आर.आर.पाटील (कवठे महांकाळ), आ.सुनील शेळके (मावळ) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच उत्कृष्ट काम केलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पद्मश्री लीला फिरोज पुनावाला (पुणे), एकनाथ विठ्ठल गाडे (जांभूळ, ता.मावळ) यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय राज्यातील काही आदर्श सरपंच आणि आदर्श ग्रामसेवकांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.