महाआघाडीच्या प्रचाररॅलीने वेधले लक्ष, भर उन्हात फिरले प्रमुख मार्गाने

ना.विजय वडेट्टीवार यांनी धरला ठेका

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.१७) महाविकास आघाडीच्या वतीनेही गडचिरोली शहरात रॅलीचे आयोजन केले होते. खुल्या वाहनावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह उमेदवार डॅा.नामदेव किरसान, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी विराजमान होते.

चंद्रपूर मार्गावरील प्रचार कार्यालयातून रॅलीला सुरूवात झाली. तत्पूर्वी रॅलीत सहभागी होण्यासाठी आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या पथकासोबत ना.विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचा झेंडा हाती घेत ठेका धरला. एवढेच नाही तर त्यांच्याकडील ढोलकी गळ्यात अडकवून ती वाजवली.

शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरत ही रॅली इंदिरा गांधी चौकातून पुन्हा प्रचार कार्यालयात जाऊन समाप्त झाली. गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास यावेळी ना.वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.