लक्षणे नाहीत, तरीही असू शकतो मलेरिया, अडीच लाख लोकांचे रक्तनमुने घेणार

जि.प.आरोग्य विभागाची विशेष मोहिम

गडचिरोली : राज्यात डासजन्य आजारांचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात हा आजार बळावू न देण्याचा निर्धार करत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी जिल्हास्तरापासून तर आशा वर्करपर्यंत सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली जात असून मलेरियाप्रवण भागात लक्षणे नसतानाही मलेरिया असण्याची शक्यता असल्याने जवळपास अडीच लाख लोकांच्या रक्तनमुन्यांची पावसाळ्यापूर्वीच तपासणी केली जाणार आहे.

गावागावत जाऊन लक्षणविरहित लोकांचे रक्तनमुने घेतले जात आहेत. मलेरियाचा उद्रेक टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. याशिवाय पावसाळ्यापूर्वी मच्छरदाण्यांचेही वाटप केले जाणार आहे. मलेरिया पॅाझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांकडून नियमित औषधोपचार घेतल्या जात आहे की नाही, याचेही नियंत्रण आरोग्याकडून केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी दिली.