‘आदर्श खासदार’ पुरस्कार लोकसभा क्षेत्रातील जनतेला व कार्यकर्त्यांना समर्पित

सत्कारप्रसंगी खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आणि लोकसभा क्षेत्रातील जनतेने मला प्रेम, जिव्हाळा, सन्मान दिला हिच माझी खरी कमाई आहे. त्यामुळे या सर्व लोकांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील. मला पुण्यात मिळालेला आदर्श खासदार हा पुरस्कारही मी लोकसभा क्षेत्रातील जनतेला समर्पित करतो, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

पुणे येथे जाधवर ग्रुपच्या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने गडचिरोली-चिमूरसारख्या प्रतिकुल परिस्थिती असलेल्या लोकसभा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना नुकताच आदर्श खासदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल ३ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रबोधिनी गडचिरोलीतर्फे त्यांचा चामोर्शी मार्गावरील साई मंदिराच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, विश्व हिंदू परिषदेचे नेते रामायण खटी, भारतीय किसान मोर्चाचे नेते उदय बोरावार, लोकसभा समन्वय प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश नेत्या डॉ.शर्मा, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॅा.भारत खटी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जेष्ठ नेत्या वच्छला मुनघाटे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जेष्ठ नेते गजानन येनगंदलवार, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अॅड.निळकंठ भांडेकर, गोवर्धन चव्हाण, रविंद्र भांडेकर, सुधाकर पेटकर, दत्तू माकोडे, विनोद देवोजवार, प्रशांत आलमपटलावार, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रबोधिनीचे पदाधिकारी व संचालकांनी परिश्रम घेतले.

जुन्या आठवणींना दिला उजाळा

यावेळी खा.नेते यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, परिवहन अधिकारी असलेल्या मोठ्या बंधूंमुळे मी गडचिरोलीत आलो आणि स्थिरावलो. उदरनिर्वाहासाठी खानावळ सुरू केली. ही खानावळ चालवत असताना दररोज विविध क्षेत्रातील लोक माझ्याकडे जेवण करायला यायचे. कोणीही उपाशी जाणार नाही याची दक्षता घेत असल्याने असंख्य लोकांचे आशीर्वाद मिळत गेले. त्यातूनच ऋणानुबंध वाढत गेले. सामाजिक आणि राजकीय जीवनाची आवड निर्माण झाली.

दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून काम करताना २० वर्षांपूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा यात झालेला फरक स्पष्टपणे दिसून येतो. जिल्ह्यातील कोणत्याही विकासाच्या कामात मी कोणाला कधी आडकाठी आणली नाही आणि पुढेही हेच करणार आहे. दळणवळणाच्या सोयी वाढल्यामुळे पुढील काळात विकासाचा वेग आणखी वाढेल. तुमचे प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास ही माझी उर्जा आहे. ते सदैव मिळू द्या, मी या भागाला विकासित जिल्ह्यांच्या रांगेत आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पगडी आणि शाल-स्मृतिचिन्ह देऊन सत्कार

यावेळी खासदार अशोक नेते यांचा डोक्यात पगडी घालून आणि शाल-श्रीफळ, तथा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी खा.नेते यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भुरसे, संचालन डॅा.भारत खटी यांनी, तर आभार अॅड.निलकंठ भांडेकर यांनी मानले.

खासदारांच्या कार्यकाळात झालेली कामे

गोंडवाना विद्यापीठ, वैनगंगा नदीवरील बॅरेजेस, पूलवजा बंधारे, जमिनीचे पट्टे, शासकीय मेडिकल कॅालेज, वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग, नवीन रेल्वे लाईन मंजुरी, सुरजागड लोहखाण, कोनसरी लोह प्रकल्प, प्रस्तावित हवाई पट्टी, राष्ट्रीय महामार्ग, नवीन रेल्वेमार्गासाठी धानोरा, मुरूमगांव, भानुप्रतापपूर (छतीसगड)पर्यंत सर्व्हेलाईन, तसेच आष्टी, आलापल्ली, आदिलाबाद, मंचेरियल आणि कांपाटेंपा, चिमूर, वरोरा अशा नवीन रेल्वेलाईनच्या सर्व्हेला मंजुरी.