भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : भाग्यश्री आत्राम

तालुकास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

एटापल्ली : विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नितीमुल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

एटापल्ली तालुका मुख्यालयातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती बेबी नरोटी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, नगर पंचायतीचे गटनेता जितेंद्र टिकले, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, सहाय्यक प्रशासन अधिकारी टी.बी. मडावी, राकाँचे शहर अध्यक्ष प्रसाद राजकोंडावार, गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे, मुख्याध्यापक संदीप सुखदेवे, प्राचार्य विनय चव्हाण, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

भाग्यश्रीताई पुढे म्हणाल्या, विद्यार्थी स्वतंत्र, तेज बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्तगुण हेरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा असतो. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मात्र कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे यांनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 186 शाळा असून जवळपास 725 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या बाल, कला व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात झाले. बालगोपालांनी देखाव्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.